प्रभाताईंच्या तरुणपणीच्या शास्त्रीय संगीत गातानाच्या भावमुद्रा आजही चेहऱ्यावर दिसतात, ही त्यांच्या साधनेची शक्ती आहे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : भारतरत्न श्रद्धेय स्व. अटल बिहारी वाजपेयीजी हे देशाच्या राजकारणातील आदर्श आणि सुसंस्कृत व्यक्तीमत्व होते. वंदनीय अटलजींच्या स्मृती चिंरतन ठेवण्याच्या उद्देशाने संस्कृती प्रतिष्ठान दरवर्षी समाजातील मान्यवरांना ‘अटल संस्कृती गौरव’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करते. यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे आणि प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, प्रभाताईंच्या तरुणपणीच्या शास्त्रीय संगीत गातानाच्या भावमुद्रा आजही चेहऱ्यावर दिसतात, ही त्यांच्या साधनेची शक्ती आहे. डॉ. चौधरी यांच्या कार्यामुळे इंधन आयातीवर खर्च होणारे परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाचले आहे. या दोघांचे कार्य महान आहे, अशा शब्दात त्यांनी दोन्ही पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्वांच्या कार्याचा गौरव केला.
अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या माध्यमातून देशाला गौरव वाटेल अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला असून या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार आणि शब्द कायम स्मरणात राहतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
यावेळी पाटील यांनी शिल्पकला, चित्रकला, रंगावली, कॅलीग्राफी, फोटोग्राफी अशा विविध कलेच्या संगमातून साकारण्यात आलेल्या ‘अटलपर्व’ या भव्य प्रदर्शनीस भेट देखील दिली. यावेळी कलाकारांनी आपल्या प्रतिभेने अटलजींचे जीवनचरित्र साकारून मानवंदना दिली.
यावेळी खासदार प्रकाश जावडेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ.शां.ब. मुजुमदार, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!