इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान आणि रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र-2 योजना राबविण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयाचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्वागत

32
मुंबई : महाराष्ट्र राज्यात वस्त्रोद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यानुषंगाने, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात यंत्रमाग व्यवसायाला (पॉवरलूम) प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत रेशीम उद्योगाच्या विकासासाठी “सिल्क समग्र २” योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या या निर्णयाचे चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान देण्यास मान्यता देण्याच्या या निर्णयामुळे ४०० उद्योगांना फायदा होणार आहे. तसेच, “सिल्क समग्र २” योजनेमुळे रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. या निर्णयाबद्दल महायुती सरकार तसेच संपूर्ण मंत्रिमंडळ यांचे चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.

पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  यासाठी वस्त्रोद्योग धोरण 2018-23 मधील अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. याचा फायदा ४०० उद्योगांना होणार आहे.

राज्यातील रेशीम शेतीला चालना मिळून राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-2 ISDSI ही योजना 2021-22 ते 2025-26 या कालावधीत राज्यात राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्या रेशीम उद्योग राज्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे.  त्यामुळे या उद्योगाचा विकास करण्यासाठी महारेशीम अभियान राबवून तुती लागवड करणाऱ्या व टसर रेशीम उद्योग करू इच्छिणाऱ्या नवीन लाभार्थ्यांसाठी व्यापक प्रमाणावर मोहिमही राबविण्यात आली आहे.  

Get real time updates directly on you device, subscribe now.