शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या रंगमंचचे  उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

13

सोलापूर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यातील सहा महसूली विभागात शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलने आयोजित केली आहेत. त्यामधील सोलापुरात आयोजित शतक महोत्सवी विभागीय नाट्य परिषदेचे आज उद्घाटन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत झाले. शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मुख्य रंगमंचाचे पूजन व उद्घाटन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रजव्लन करुन करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने कलावंतांचा मेळा सोलापूर नगरीत होत असल्याचा मनापासून आनंद होत आहे. यामुळे सोलापूरकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे. नाट्य प्रेमी आणि रंगकर्मींसाठी जुळे सोलापूर येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नाट्य क्षेत्रातील मंडळींचे विचार आणि सूचना जाणून घेऊन, आराखडा तयार करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.
सोलापूर ही कलावंतांची भूमी आहे. येथील कलावंतांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जुळे सोलापूर येथे नाट्यगृहाची उभारणी करण्यात येणार असून महापालिका जागा उपलब्ध करून देत आहे. तर नाट्यगृहाच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 10 कोटीचा निधी मंजूर केलेला असून यापेक्षा अधिक निधीची गरज भासल्यास सांस्कृतिक कार्य विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले.
 यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, संमेलन कार्यवाह विजयदादा साळुंके, प्राचार्य शिवाजीराव सावंत, संमेलन कार्याध्यक्ष प्रकाश युलगुलवार, समन्वयक कृष्णा हिरेमठ, रणजित गायकवाड, पी. पी. रोंगेसर, सहकार्यवाह विश्वनाथ आवड, तेजस्विनी कदम, नरेंद्र काटीकर,  दत्ता अण्णा सुरवसे, मोहन डांगरे, भरत जाधव, नाट्यरसिक, कलांवत आदि उपस्थित होते.
नाट्य संमेलनाचे प्रास्ताविक विजयदादा साळुंके यांनी केले. नाट्य संमेलनातील कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली. हे नाट्य संमेलन सोलापूर येथील कलावंतासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी एक प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. तरी कलावंतांनी त्याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे व  अमृत ढगे यांनी केले तर आभार तेजस्विनी कदम यांनी मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.