मुंबई : भारत सरकारने आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी यांना “भारतरत्न” देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आनंद व्यक्त केला. भारत सरकारचा हा निर्णय अत्यंत आनंदायी आणि अभिमानास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले.
पाटील यांनी माहिती दिली कि, आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी यांनी संपूर्ण जीवन राष्ट्र सेवा आणि समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित केले आहे. आपल्या राजकीय कौशल्याने, प्रशासकीय अनुभवाने आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाने अडवाणींनी भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली. आपल्याला कार्यकुशल नेतृत्वाने राष्ट्र उभारणीत त्यांनी दिलेले योगदान अजोड आहे. त्यांचा त्याग, संघर्ष आणि समर्पण हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे पाटील यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी यांना देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करून करोडो देशवासियांना अभिमानाचे क्षण मिळवून दिले आहेत. त्याबद्दल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच अडवाणीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन देखील केले.