“नागपूर पुस्तक महोत्सव – २०२५” या भव्य सोहळ्याच्या पोस्टरचे प्रकाशन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
मुंबई : नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी), शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील “नागपूर पुस्तक महोत्सव – २०२५” या भव्य सोहळ्याच्या पोस्टरचे प्रकाशन आज शासकीय निवासस्थान, मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, आणि ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर उपस्थित होते.
हा महोत्सव २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान रेशीमबाग मैदान, नागपूर येथे भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे. देशभरातील प्रकाशक, लेखक, साहित्यप्रेमी आणि वाचकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित असून, हा महोत्सव “पुस्तक संस्कृतीचा उत्सव” म्हणून साजरा होणार आहे. सर्व पुस्तकप्रेमींनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.
३०० स्टॉल्समध्ये स्पर्धा परीक्षा, अभ्यासक्रम, विज्ञान तंत्रज्ञान, बॉयोग्राफी, मानसिक शांती, फिटनेस ते आध्यात्मापर्यंतच्या विषयाच्या लक्षावधी पुस्तका यात उपलब्ध राहणार आहेत. विशेषत्वाने विद्यार्थी व तरुणांचे लक्ष वेधणाऱ्या पुस्तकांचा समावेश यात असेल. आहे. विविध भाषा, अनेक विषय आणि प्रत्येक वयोगटाला आकर्षित करतील अशी लक्षावधी पुस्तके या महोत्सवात उपलब्ध होणार आहेत. देशभरातील नामवंत लेखक, प्रकाशक, वक्ते या महोत्सवात सहभागी होणार असून ती नागपूरकरांसाठी ज्ञानवर्धक मार्गदर्शन मिळण्याची संधी ठरणार आहे.