मुलींच्या वसतिगृहात मोफत नास्ता, महिला सुरक्षा रक्षक, व्यायाम शाळा प्रशिक्षक सुविधा सुरू करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जळगाव: जळगांव येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे मुलींच्या वसतिगृहात विविध उपकरणांनी सुसज्ज व्यायाम शाळा उभारण्यात आली आहे. यासह धकाधकीच्या जीवनात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या फिटनेस व आरोग्याकडे लक्ष देता यावे यासाठी खुल्या मैदानात व्यायामशाळा सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही व्यायाम शाळेंचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उ‌द्घाटन करण्यात आले .

जळगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील मुलींच्या वसतिगृहातील मुलींसाठी रोज मोफत नास्ता, महिला सुरक्षा रक्षक व व्यायाम शाळेसाठी महिला प्रशिक्षक अशा विविध सुविधा सीएसआरच्या माध्यमातून सुरू करण्यात याव्यात. अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. स्वच्छता, योग व महिला सक्षमीकरण या तीन गोष्टींवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर आहे. त्यानुसार राज्य शासन योजना राबवित आहे. तंत्रनिकेतन मधील प्रत्येक वसतिगृहात व्यायाम शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
पाटील म्हणाले की, आपल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करावा, मुलींनी आपले शरीर निरोगी ठेवावे. एवढेच नाही तर योग साधना सुध्दा करावी तसेच मनाची एकाग्रता आणि मनाची शांती मिळवण्यासाठी दररोज मेडीटेशन करावे. असे आवाहन ही त्यांनी केले. मेडीटेशन करण्याच्या फायद्यावर त्यांनी यावेळी माहिती दिली.

जागतिक स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची गरज आहे त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ४ लाख युवक व युवतींना तांत्रिक कौशल्य व जर्मन भाषा विद्यापीठ स्तरावर शिकवून प्रशिक्षित केले जातील. सदर योजनेचा पहिला टप्पा मे २०२४ पासून सुरु करण्यात येईल. असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण नाशिक विभागाचे सहसंचालक डॉ.जी.व्ही. गर्जे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.पराग पाटील, अभियांत्रिकीचे प्राचार्य एस.आर.गाजरे, मुलांच्या वसतिगृहाचे कुलमंत्री डॉ .एस.एन.शेळके, मुलींच्या वसतिगृहाचे कुलमंत्री डॉ. आर.डी.गोसावी, डॉ.अमृता कोतकर व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!