हातमाग विणकरांच्या पेन्शनसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार  – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

4

मालेगाव : वैविध्यपूर्ण गुणांनी सर्वसंपन्न असलेली पैठणी म्हणजे महाराष्ट्राचं वैभव! राज्याच्या या वैभवशाली परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यात विणकरांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वस्त्रोद्योग वाढीस चालना देण्यासाठी व वस्त्र उद्योगाला आवश्यक त्या उपाययोजनांचा हातभार लावण्यासाठी वस्त्रोद्योग धोरण २०२३-२४ अंतर्गत विणकरांना उत्सव भत्ता देण्यात येणार आहे. वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी आपल्या नाशिक प्रवासादरम्यान येवला येथील विणकर बांधवांना या भत्याचे वाटप केले. येवला येथील महात्मा फुले नाट्यगृहामध्ये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत हातमाग विणकरांना उत्सव भत्ता धनादेश वाटप सोहळा चंद्रकांत पाटील व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडला.

हातमाग विणकरांच्या व्यवसायाला चालना व या उद्योगाला उभारी देण्यासाठी हातमाग विणकरांना उत्सव योजनेचा लाभ वर्षातून किमान दोन ते तीन वेळेस देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर विणकरांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा शासनस्तरावर विचार सुरू असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले की, देशात येवल्याच्या पैठणीचा नावलौकिक आहे. याचबरोबर शाल, पैठणी, घोंगडी या पारंपारिक व्यवसायात विणकर हे वर्षभर काम करतात. परंतु, त्यांना पाहिजे तसा मोबादला मिळत नाही. त्यामुळे उत्सव योजनेच्या माध्यमातून विणकरांचा व्यवसाय टिकण्यास मदत होईल व कुटूंबाला उदरनिर्वाह होण्यास मदत होईल. त्याअनुषंगाने विणकरांना वर्षातून किमान दोन ते तीन वेळेस लाभ देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत.

नोंदणीकृत व प्रमाणित हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या उत्कृष्ट वाणाला सन्मान मिळण्यासाठी शासनाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत विविध योजना जाहीर केल्या आहेत. या धोरणाच्या माध्यमातून विणकरांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही  पाटील यांनी यावेळी केले.
ह्या कलेच्या संवर्धनासाठी राज्यातील हातमाग कामगारांना बळ मिळावे यासाठी माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजींच्या शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर हा उत्सव भत्ता सुरू करण्यात आला आहे. हातमाग कामगारांचा भविष्यकाळ सुखी रहावा यासाठी या कारागिरांना पेंशन सुरू करण्याचा शासनाचा विचार असून त्यासाठी हातमाग कारागिरांची नोंदणी सुरू आहे, अशी भावना यावेळी स्पष्ट केली. तसेच असंघटित क्षेत्रातील कारागिरांना मिळणारे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजे, असा माननीय मोदीजींचा आग्रह असून वर्षातून दोन वेळा उत्सव भत्ता देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असेही यावेळी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नागरिकांचा सत्कार केला.
यावेळी आमदार किशोर दराडे, वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव श्रद्धा कोचरेकर,  प्रादेशिक उपायुक्त दिपक खांडेकर, वस्त्रनिर्माण निरीक्षक गजानन पात्रे, तांत्रिक सहाय्यक एस. बी. बर्मा यांच्यासह यंत्रमाग संघटनेचे पदाधिकारी, कामगार व नागरिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.