भाजप चित्रपट कामगार आघाडीच्यावतीने जळगाव मध्ये प्रथमच चित्रपट महोत्सवाचे आयोजन

जळगाव : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा अंतर्गत असलेल्या चित्रपट कामगार आघाडीच्यावतीने जळगावात ‘महोत्सव चित्रपटाचा- सन्मान कलाकारांचा-२०२४’ या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात स्थानिक कलाकारांचा सन्मान करण्यात येणार असून नाट्यशास्त्र, ॲक्टिंग अकॅडमी आणि जनसंवाद व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार उपस्थितांशी संवाद साधणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपच्या वसंतस्मृती जिल्हा कार्यालयात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, चित्रपट आघाडीचे महानगर अध्यक्ष रोहीत चौधरी, जिल्हा सरचिटणीस महेश जोशी, प्रसिद्धी माध्यम समन्वयक मनोज भांडारकर, सांस्कृतिक आघाडीचे महानगर अध्यक्ष पवन खंबायत, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित आदी उपस्थित होते.

दीक्षित पुढे बोलतांना म्हणाले की, चित्रपट कामगार आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस गीतांजली ठाकरे यांच्या पुढाकाराने प्रथमच जळगावात ‘महोत्सव चित्रपटाचा, सन्मान कलाकारांचा – २०२४’ चे आयोजन होत आहे. दि.१, २ आणि ३ मार्च असे तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे. या तीन दिवसात एकूण सहा चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यात दोन हिंदी आणि चार मराठी चित्रपटांचा समावेश असणार आहे. दि. १ रोजी दुपारी १२ वाजता मै अटल हू, दुपारी ३ वाजता शिरीष राणे लिखित आणि दिग्दर्शित दिल दोस्ती दिवानगी, दि.२ रोजी दुपारी १२ वाजता तानाजी घाडगे दिग्दर्शित पिल्लू बॅचलर, ३ वाजता रमेश मोरे दिग्दर्शित साथ सोबत आणि दि. ३ रोजी दुपारी १२ वाजता अभिनेता प्रवीण चंद्र यांचा गुठली लड्डू आदी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.तर ३ वाजता मेकअप आर्टिस्ट एन. ललित उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. शहरातील स्टार सिनेमा या ठिकाणी हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत तर या गोष्टीला नाव नाही(दिग्दर्शक- संदीप सावंत) हा अप्रदर्शित चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

जळगावात चित्रपट निर्मितीला वाव आहे. या ठिकाणी उत्तम निर्माते आणि कलाकार आहेत. त्यामुळे जळगावपासून महोत्सवाला सुरुवात करण्यात येत आहे. जळगावनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे चित्रपट महोत्सव घेण्यात येणार आहेत. स्थानिक कलाकारांना प्रवाहात आणणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश असून या कलाकारांचा या महोत्सवात सन्मान करण्यात येणार आहे. तसेच त्यांची संपूर्ण माहिती देणारे बँनर या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्या-त्या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, मेकअप आर्टिस्ट त्यांचे अनुभव सांगून मार्गदर्शन करणार आहेत. हे मार्गदर्शन कलाकारांसह विद्यार्थ्यांसाठी मोलाचे ठरणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित यांनी यावेळी सांगितले.

महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन

यावेळी बोलतांना आ. राजूमामा भोळे यांनी, ज्या कलाकारांना चित्रपट क्षेत्रात काम करायचे आहे, अशा कलाकारांना मुंबईशी जोडून देण्याचे काम भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या माध्यमातून सुरु आहे. जळगावात आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवाला जास्तीत जास्त कलाकार, चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन करून हा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडल्यास पुढील वर्षी या पेक्षा मोठा महोत्सव घेवू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!