पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीला टक्कर देणार संघर्षकन्या; भारती कामडी
प्रतिनिधी / विरार : मूळच्या पालघर जिल्ह्यातील असलेल्या भारती कामडी 2015 साली वाडा-मांडा गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर 2020 साली विक्रमगड-तलवाडा गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. विक्रमगड (तलवाडा) सारख्या डोंगराळ दुर्गम भागात शिवसेनेची विजयी पताका फडकवण्याचे महत्त्वपूर्ण काम त्या वेळी भारती कामडी यांनी केले. तब्बल 22 वर्षांहून अधिक काळ शिवसेना पक्षवाढ आणि पक्ष बांधणीसाठी त्यांनी मेहनत घेतली आहे. 2015 पासून पालघर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून त्या निवडून येत आहेत. 2019 साली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. दीड वर्ष त्यांनी हे पद भूषवले आहे.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ‘संघर्षकन्या` भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारती कामडी यांच्या नावाची घोषणा केली.
लोकाभिमुख कामांतून जिल्हा परिषदेवर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. कोविड-19 संक्रमण काळातही त्यांनी लक्षणीय कामगिरी केलेली आहे. कोरोना लस घेण्याबाबत नागरिकांत गैरसमज होते. आदिवासी बांधव लस घेण्यास तयार नव्हते. या पार्श्वभूमीवर भारती कामडी यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या समाज बांधवांत लस घेण्याबाबत जनजागृती केली होती. त्यांना लस घेण्यास प्रवृत्त केले होते. स्वत:च्या पैशांतून त्यांनी या काळात गरजवंतांना आरोग्य सेवा, धान्य वाटप अशी जनसेवा दिली होती.
वाढवण बंदर प्रश्नावरही त्यांची ठाम भूमिका राहिली आहे. मच्छीमार, स्थानिक शेतकरी आणि अन्य नागरिकांसोबत राहण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. पालघर जिल्ह्याची स्थापन होऊन दहा वर्षे झाली आहेत. हा जिल्हा विकासात मात्र मागे आहे. तरुणांचे रोजगारासाठीचे स्थलांतर, पेसा भरती अशा विविध मुद्द्यांवर त्या सातत्याने आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आल्या आहेत. पालघर जिल्हा स्वतंत्र झाला. राज्यपालांनी आदिवासी नोकर भरती करण्यासाठी अधिसूचना काढली; पण ती कागदावर राहिली होती. या प्रश्नावर भारती कामडी यांनी सरकारचे लक्ष वेधले होते.
तौक्ते चक्रीवादळाच्या वेेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागांत भेटी दिल्या होत्या. या वादळात मच्छीमार बोटी, वीटभट्टी, कुक्कुटपालन व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या सगळ्याचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यातूनच त्यांना ‘संघर्षकन्या` अशी ओळख प्राप्त झालेली आहे. संघर्षाच्या काळातही त्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्या आहेत. या एकनिष्ठेचे फळ म्हणूनच त्यांची लोकसभा उमेदवारी निश्चित झाली आहे. शांत-संयमी, अनुभवी, अभ्यासू आणि कार्यक्षम अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या प्रतिमा व प्रतिभेचा आणि पालघर जिल्ह्यातील लोकसंपर्काचा शिवसेनेला फायदा होईल, असे मत भारती कामडी यांच्या लोकसभा उमेदवारीच्या निमित्ताने व्यक्त केले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. चांगल्या प्रकारे लढू आणि निवडून येऊ, असा विश्वास भारती कामडी यांनीही व्यक्त केला आहे.