सोलापूर : कामगार दिनानिमित्त सोलापुरातील निवृत्त पेन्शनर कर्मचारी संघटनेने मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी त्यांनी सर्वांना महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, मी स्वतः गिरणी कामगाराचा मुलगा आहे. कामगारांचे प्रश्न सुटावेत, त्यासाठी देवेंद्रजींच्या कार्यकाळात अनेक प्रयत्न झाले. दुर्दैवाने २०१९ ला विश्वासघातामुळे राज्यातील सरकार गेले. ३३ महिन्यानंतर पुन्हा सरकार आले. मोदीजींनी १० वर्षांत सर्वसामान्यांचे हित समोर ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना लागू करून वयोवृद्धांचे आरोग्य सुरक्षित केले. याच आदर्शाचे पालन करून आमचे सरकार गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली. लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते आम्हा सर्व वयस्कर मंडळींचे नातू आहेत. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
या वेळी मोहन डांगरे, लक्ष्मण महाराज चव्हाण, सुधीर बहिरवडे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.