केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल… सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल
भिवंडी : केंद्रीय मंत्री तथा लोकसभेचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भिवंडी येथील अन्सारी मैदान येथील मतदान केंद्रावर सोमवारी कपिल पाटील यांनी पोलीस आणि मतदार केंद्राबाहेरील नागरिकांना दमदाटी, शिवीगाळ केली होती. यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपिल पाटील यांनी मतदानादिवशी अन्सारी मैदान येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान सुरु असल्याचा आरोप केला. यावरून मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी केली होती. तेथील नागरिकांना देखील दमदाटी आणि शिवीगाळ केली. याचे चित्रीकरण प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सरकारी कामात अडथळा तसेच अधिकारी व पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी उमेदवार कपिल पाटील यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल पाटील, दादा गोसावी, भाजपचे भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटील आणि रवी सावंत या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.