केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत केली महत्वपूर्ण बैठक

दिल्ली : पुण्याच्या विविध प्रश्नांबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमितशाह यांच्यासोबत गृहमंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल कार्यान्वित करणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. हे दोन्ही विषय अमित शाह यांच्या अखत्यारित असून त्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर तातडीने या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
मोहोळ यांनी माहिती दिली कि, पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल लवकरच सुरू करण्यासंदर्भात अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यासाठी आवश्यक असलेल्या सीआयएसएफच्या मनुष्यबळाची पूर्तता लवकरच गृहविभागाकडून करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे. यामुळे नवे टर्मिनल सुरू करण्याला गती प्राप्त झाली आहे. हे टर्मिनल लवकर सुरू करून पुणेकर प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे मोहोळ यांनी म्हटले.
पुणे महापालिकेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून येणारा निधी गेली काही काळ प्रलंबित होता. शहरातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन व पूर नियंत्रणासाठी हा निधी तत्काळ मिळावा, अशी मागणी देखील या बैठकीत केली. त्यावरही अमित शाह यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याची मोहोळ यांनी दिली.