२५० कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखडयास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मान्यता

55
सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोलापूर जिल्हयाच्या दौऱ्यादरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मान्यतेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीस पार पडली. दरम्यान, जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर जिल्ह्याला आणून स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे यासाठी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेऊन जल, कृषी, धार्मिक व विनयार्ड पर्यटनाच्या अनुषंगाने विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून सुमारे 250 कोटीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला आहे. त्यास मान्यता देण्यात येत असून यावर्षीच्या अंदाजपत्रकात निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे प्राथमिक स्तरावर जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले व यावेळी उपमुख्यमंत्री महोदयाकडून या बजेटमध्ये तरतूद केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. या अनुषंगाने आज पालकमंत्र्यांकडून या आराखड्यास मान्यता मिळाल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आजच राज्य शासनाला आराखडा सादर करण्यात येईल. तसेच उजनी धरणात जल पर्यटन, 94 धार्मिक स्थळे असल्याने धार्मिक पर्यटन, कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने कृषी पर्यटन तसेच विनयार्ड पर्यटन विकसित होण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण केल्यास जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिण विकास होऊन येथे देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन स्थानिक नागरिकांची आर्थिक उन्नती होणार असल्याचे मत पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.