सांगलीत घुमली ‘महाराष्ट्र श्री २०२६’ ची गर्जना! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शरीरसौष्ठवपटूंचा गौरव
सांगली : महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन आणि तरुण भारत व्यायाम मंडळ, बॉडी बिल्डर असोसिएशन ऑफ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र श्री २०२६ राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव व फिजिक स्पोर्ट्स स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा जत विधानसभा मतदारसंघ आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित राहून खेळाडूंच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन दिले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, तरुणांनी जिद्द, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर घडवलेले व्यक्तिमत्त्व पाहून अभिमान वाटला. क्रीडासंस्कृती आणि निरोगी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अशा स्पर्धा निश्चितच प्रेरणादायी ठरतात, असेही पाटील म्हणाले.
ग्रामीण भागातील तरुणांनी शरीरसौष्ठव सारख्या खेळांकडे वळावे आणि राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, अशी भावना पडळकर यांनी व्यक्त केली.
संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या नामवंत शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या सुडौल आणि कमावलेल्या शरीरयष्टीचे प्रदर्शन केले. ‘महाराष्ट्र श्री’ हा मानाचा किताब पटकावण्यासाठी खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम, चषक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, तरुण भारत मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, गटनेते तथा नगरसेवक संदीप आवटी, आदी सर्व बॉडी बिल्डर असोसिएशन पंच, नामवंत प्रसिद्ध बॉडी बिल्डर्स, सर्व महिला व पुरुष सहभागी स्पर्धक, समस्त सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.