सोलापूर १९ जून : सोलापूरमधील हुतात्मा स्मृती मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. शिक्षणातून नोकरी आणि उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडत नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केल्यास निश्चितच फायदा होईल, असे या वेळी पाटील यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, शासनाने कौशल्य विकास विभागाअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध कोर्स आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबरोबर कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आलेला आहे. शासनाकडून तरूणांना उद्योग सुरू करण्यासाठी विविध सवलतीच्या कर्ज योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या कर्ज योजनेचा फायदा घेऊन उद्योग उभारून नोकरी देणारे बनावे. तसेच भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना शिक्षणासोबत रोजगार प्राप्त होत आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन कौशल्य विकास केल्यास त्यांना परदेशात मोठ्या पगाराची संधी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या शिबिरास एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना नामवंत शिक्षण तज्ञांकडून भविष्यातील शिक्षण व करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, करिअर विषयक मार्गदर्शक सुनील चोरे,नितीन शेळके, श्रीकांत घाडगे, दाजी ओबांसे, डॉ. संदीप तापकीर, राम सुतार तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रही उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.