धर्मपुरी येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करत केले माउलींच्या रथाचे सारथ्य
पंढरपूर : आज संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले असता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी धर्मपुरी येथे पालखीचे तसेच सर्व वारकरी बंधू-भगिनींचे स्वागत करून संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊलींचे मनोभावे दर्शनही घेतले. या वेळी “माऊली माऊली”च्या जयघोषात दुमदुमणाऱ्या अवघ्या सोलापुरास चैतन्यमय रूप प्राप्त झाले होते!
धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माऊलीच्या रथाचे सारथ्य केले. रथामध्ये त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधीनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर गेले. टाळी वाजवावी, गुढी उभी रहावी, वाट ती चालावी पंढरीची… या संत वचनानुसार टाळ मृदंगाचा गजर आणि मुखाने जय हरी विठ्ठल… जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा… तुकाराम चा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता.
धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, अकलूजचे प्र. उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माऊलींच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.