मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक दिलीप मधुकर पाटील यांच्या निधनाने मराठा समाज एका कृतिशील नेतृत्वास हरपले – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक दिलीप मधुकर पाटील यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान पुणे येथे हलवत असताना कराड जवळ त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि धक्कादायक असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दिलीप मधुकर पाटील यांनी नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मराठा आरक्षणाच्या लढ्यात समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे नेहमीच सहकार्य लाभले. त्यांच्या निधनाने मराठा समाज एका कृतिशील नेतृत्वास हरपले आहे. पाटील यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली ! ईश्वर पाटील कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना, अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
दिलीप मधुकर पाटील यांच्या निधनामुळे मराठा समाजातील मराठा आरक्षण चळवळीचे नुकसान झाले आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यापासून ते सारथी संस्था व अण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षम करण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, मुलगा, मुलगी, जावई, नातवंड असा परिवार आहे.