शि.द.फडणीस यांच्या कार्याचा गौरव म्हणून लवकरच व्यंगचित्रकलेसाठी अकादमी सुरु करण्यात येईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांच्या जगतात आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे शि.द.फडणीस अर्थात शिवराम दत्तात्रेय फडणीस!आपल्या अंगी असलेल्या व्यंगचित्रकलेच्या जोरावर कलाक्षेत्रात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या शि.द.फडणीस यांचा सोमवारी शतक पदार्पण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी मनसेचे अध्यक्ष व व्यंगचित्रकार राज ठाकरे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या हस्ते फडणीस यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आपल्या कुंचल्यातून आगळीवेगळी चित्रनिर्मिती करून अनेकांच्या चेहऱ्यावर आजही हास्याचे कारंजे फुळविणारे शि.द.फडणीस आज १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मात्र या वयातही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. शि.द.फडणीस यांच्या कार्याचा गौरव म्हणून लवकरच व्यंगचित्रकलेसाठी अकादमी सुरु करण्यात येईल. राज्य सरकारचे त्याला पूर्ण पाठबळ असेल. तसेच शि.द.फडणीस यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार आणि पद्म पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज ठाकरे यावेळी म्हणाले कि, कल्पना आणि उत्तम रेखाटन एकत्र आल्यावर चांगले चित्र तयार होते. शि.द.फडणीस गेल्या ७५ वर्षांपासून सातत्याने करत आहेत. त्यांच्या चित्रात सहजता असली तरी प्रमाण कुठेही चुकलेली नाही. त्यांनी केलेली चित्रे सोपी दिसतात, तशी ती अजिबात नाहीत. त्यासाठी प्रचंड अभयस करावा लागतो. व्यंगचित्र हि सुरुवात नाही, ती चित्रकलेतील शेवटची पायरी आहे, असे ठाकरे म्हणाले.
फडणीस कुटुंबीयांतर्फे शिदं ना शंभर दिव्यांनी औक्षण करण्यात आले. याप्रसंगी कोहिनुर ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल, स्किन सिटी चे संचालक डॉ. नितीन ढेपे, गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज चे सह संस्थापक मकरंद केळकर, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन चे संचालक नचिकेत ठाकूर, महोत्सवाचे संयोजक चारुहास पंडित, वीरेंद्र चित्राव, संजय मिस्त्री आदी उपस्थित होते.