अचलपूर येथील फिनले मिल संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

82

मुंबई : आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली.

बैठकी दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी फिनले मिल सुरू करण्यात येत असलेल्या अडचणी अधोरेखीत करून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मिल कामगारांच्या मागण्यांसंदर्भात माहिती दिली. तसेच, मिल सुरू करण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाच्या सहभागाबाबत माहिती देखील त्यांनी स्पष्ट केली.

फडणवीस म्हणाले की, अमरावतीतील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क हा जागतिक दर्जाचा व्हावा, अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यानुसारच येथील सुविधा निर्माण कराव्यात. या ठिकाणी जागतिक दर्जाचे गुंतवणुकदार येण्यासाठी त्यांना त्या प्रकारचे सोयी सवलती देण्यात याव्यात. तसेच येथील उद्योगांना सौर ऊर्जेसाठी सवलती देण्यासंदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करावी.

या बैठकीस आमदार रवी राणा, आमदार बच्चू कडू (दृक श्राव्य माध्यमातून), केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कन्सल, सहसचिव प्राजक्ता लवंगारे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह तसेच फिनले मिल मधील कामगार संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.