स्वप्नील कुसळेला मुख्यमंत्र्यांकडून 1 कोटीचं बक्षीस जाहीर.. राज्यातील क्रीडापटूंच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहणाऱ्या महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील स्वप्नील कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर रायफल ३ या प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिल्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन ! खाशाबा जाधव यांच्या नंतर तब्बल ७२ वर्षानी कोल्हापूरच्या मातीला ऑलिंपिकच्या पदकाचा गुलाल लागला. कोल्हापूरबरोबरच महाराष्ट्रवासियांची मान अभिमानाने उंचावली. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील यांना महायुती सरकारतर्फे १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. राज्यातील क्रीडापटूंच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहणाऱ्या महायुती सरकारचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवाद दिले.
चंद्रकांत पाटील यांनी स्वप्नील कुसळे यांच्या या कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. त्याला पदक मिळाल्यानंतर पाटील यांनी त्यांच्या वडिलांसोबत देखील फोनवर संभाषण करून त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राचे सुपुत्र तसेच कोल्हापूरच्या रांगड्या मातीत वाढलेले ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसळे यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मी. 3 पोझिशन रायफल नेमबाजी प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून अवघ्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण ४५१.४ गुण प्राप्त केले. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं कांस्यपदक आहे. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. ही तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत.