अजितदादांना कोल्हापूरचा अखेरचा सलाम! राष्ट्रवादी भवनात अस्थि कलशाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दर्शन
कोल्हापूर : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निधनानंतर, आज त्यांचा अस्थि कलश कोल्हापूरमधील राष्ट्रवादी भवनात अंतिम दर्शनासाठी आणण्यात आला. यावेळी कोल्हापूरकरांनी लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी भवनात उपस्थित राहून अजितदादांच्या अस्थि कलशाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी दादांच्या प्रशासकीय कौशल्याचे आणि राज्याच्या विकासातील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं . या घटनेमुळे कोल्हापुरात शोककळा पसरली. बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे एक रोखठोक नेते गेल्याने कोल्हापूरच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली असल्याचे मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले. कागल, इचलकरंजी येथील कबनूरसह विविध भागांत व्यापारी वर्गाने दुकाने देखील बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. आज अजितदादांचा अस्थि कलश राष्ट्रवादी भवनात आल्यानंतर कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना अश्रू अनावर झाले होते.कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या.