वयाच्या साठ वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या हातमाग विणकरांना वार्धक्यातील शिदोरी म्हणून पेंशन देण्याचा लवकरच निर्णय – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

26

नागपूर : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नागपूर येथील नियोजन सभागृहात राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेतील बक्षीस वितरण सभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात रेशीम संचालनालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन देखील करण्यात आले. अत्यंत आव्हानांना सामोरे जात आपल्या पिढ्यानपिढ्या पासून चालत आलेल्या कलेला जीवंत ठेवण्यासमवेत त्यात आपल्या कौशल्यातून भर टाकणाऱ्या हातमाग विणकरांचे योगदान अनेक पुरस्कारांपेक्षाही मोठे आहे. वयाच्या साठ वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या हातमाग विणकरांना त्यांच्या योगदाना प्रति वार्धक्यातील शिदोरी म्हणून पेंशन देण्याचा निर्णय लवकरच महायुती सरकार घेत असल्याचे यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या हातमाग धोरणानुसार जास्तीत जास्त व्यक्तींना यातून रोजगार उपलब्ध व्हावेत यादृष्टीने आपण भर दिला आहे. उत्तम काम करणाऱ्या विणकरांचा गौरव व्हावा, त्यांच्या निर्मितीला चालना मिळावी यासाठी आपण घोंगडीपासून करवत काटी साडी, पैठणी, खण, हिमरु शाल आदी पारंपारिक कलाकौशल्यावर भर दिला आहे. याचबरोबर हातमाग व्यवसायाला लागणारे जे रेशीम आहे त्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सन्मान झाला पाहिजे याउद्देशाने आपण तुती लागवडीद्वारे भरघोस उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही पुरस्कार देत आहोत, असे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.

अल्प भू-धारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळाले पाहिजे यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. वस्त्रोद्योग व हातमाग या व्यवसायाला येणारा कच्चा माल हा शेतीतूनच येतो. यात प्रामुख्याने हातमागासाठी वरचेवर मोठ्या प्रमाणात सिल्कची मागणी वाढत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून तुती लागवडीद्वारे रेशीम कोषाची निर्मिती करणारे शेतकरी वाढले आहेत. यात त्यांनी आपल्या कष्टातून एकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन कृषी क्षेत्रातला नवा मार्ग समृद्ध केल्याचे गौरोद्गार वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकात पाटील यांनी काढले. माझे वडिल केवळ अडीच एकर शेती असल्याने गाव सोडून मुंबईकडे वळले होते. गावी सिंचनाची सुविधा झाल्यामुळे मी आता महानगरातून गावी परतलो, असे ते म्हणाले.

अगदी प्रारंभीच्या काळात भारताने उत्तम वस्त्र निर्मिती केलेली होती. तेव्हाच्या एकूण जागतिक व्यापारात 32 टक्के वाटा हा आपला होता. हातमाग वस्त्र व मसाल्याच्या पदार्थातून आपण निर्यातीवर पकड ठेवली होती. ब्रिटीशांच्या काळात जहाज निर्मितीलाही भारतीयांनी आपले कौशल्य सिध्द करुन दाखविले होते. हे वैभव ब्रिटीशांनी लुटून नेले हे आपण विसरता कामा नये. अशा परिस्थितीत आपण स्वातंत्र्यानंतर आज पुन्हा जागतिक पातळीवर एक भक्कम स्थिती गाठल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कष्टकरी, विणकरी आणि इतर कारागिरांसाठी अनेक विकासाच्या योजना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनही अनेक योजना घेऊन विणकरांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले.

यावेळी वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा, रेशीम संचालनालयाच्या संचालिका वसुमना पंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.