पीएम मित्रा पार्क हा प्रकल्प अमरावतीसाठी गेमचेंजर ठरणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शुक्रवारी वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होत अमरावती येथील पीएम मित्रा पार्कची पायाभरणी केली. यासोबतच ‘पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप’ योजनेचा शुभारंभ केला. मोदिजी एखाद्या योजनेचा किती बारकाईने अभ्यास करतात, हे विश्वकर्मा योजनेकडे पाहिल्यास कळते, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. देशाच्या तळागाळातील कारागिरांना सक्षम उद्योजक बनविण्याचा त्यांचा संकल्प सिद्धीस जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, 20 लाख पेक्षा जास्त लोक या योजनेशी जोडले गेले आहेत. एका वर्षात आठ लाखांपेक्षा जास्त शिल्पकारांना प्रशिक्षण देण्यात आले असून फक्त महाराष्ट्रातच 60000 पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. यात मॉडर्न मशनरी डिजिटल टूल सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकवले जात आहे. आतापर्यंत सहा लाख पेक्षा जास्त विश्वकर्मा बंधूंना आधुनिक उपक्रम दिले आहेत त्यामुळे त्यांच्या उत्पादनांचा दर्जा चांगला झाला आहे. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील नागरिकांनी या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला आहे.
पीएम मित्रा पार्कची पायाभरणी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते झाली. हा प्रकल्प देखील अमरावतीसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे पाटील यांनी म्हटले. सुमारे साडेसहा लाख कुटुंबांचे जीवनमान या माध्यमातून बदलणार आहे. संकल्प ते सिद्धी ही माननीय मोदींच्या कारकिर्दीची ओळख आहे. त्यांनी आज महाराष्ट्रात सुरु केलेल्या योजना त्यांच्या याच कार्यकाळात सिद्धीस जावोत, ही सदिच्छा पाटील यांनी व्यक्त केली.
पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात पार पडला. यावेळी राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.