वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांना डॉ.एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे आज संपन्न झाला.
समाजमाध्यमांचा वाढता वापर, बदललेली जीवनशैली यामध्ये सुद्धा ग्रंथालयाचे महत्व अबाधित आहे. ग्रंथ आणि ग्रंथालय हे शाश्वत असून वाचनसंस्कृती ही ग्रंथालयांमुळेच टिकून आहे. वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक आहे, असे प्रतिपादन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.
पाटील म्हणाले, ग्रंथालयांना आर्थिक सहाय्य योग्य पद्धतीने मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जर नवीन पिढी ग्रंथालयाकडे जात नसेल तर नवनवीन प्रयोग करून त्यांच्यापर्यंत ग्रंथालय आणणे गरजेचे आहे. फिरते वाचनालय, ई वाचनालय अशा विविध पद्धतीने लोकांपर्यंत वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालय संचालनालय काम करीत आहे. सर्वांनी मिळून ग्रंथालय, वाचनालयाचा आत्मा समजून घेऊन ग्रंथालयाची चळवळ विकसित करण्याची गरज आहे.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,उपसचिव प्रताप लुबाळ, ग्रंथालय संचालक, अशोक गाडेकर,राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आदी उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.