देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन… यांच्या निधनाची बातमी चटका लावणारी -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

76

मुंबई : ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन. वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शिवराज पाटील चाकूरकर आयुष्यभर काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय राहिले. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. काँग्रेस नेतृत्वाच्या विश्वासातले मानले जाणारे शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या निधनाची बातमी चटका लावणारी असल्याच्या भावना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटले, भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या निधनाची बातमी चटका लावणारी आहे. नव्वदीतले पाटील-चाकूरकर देशातील अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार होते. त्यांचा राजकीय प्रवासही प्रदीर्घ होता. ते नेहमीच काँग्रेस नेतृत्वाच्या विश्वासातले मानले जात. शिवराज पाटील-चाकूरकर यांना आदरांजली. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

चाकूरकर यांनी लातूरचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणात पाऊल टाकले. महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, संसदेच्या अनेकविध समित्यांचे सदस्य,आणि पुढे केंद्रातील विविध खात्यांचे मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची कारकिर्द राहीली. लोकसभा सदस्य म्हणून ते सातवेळा निवडून आले होते. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी संसदेशी निगडित अनेक अभिनव उपक्रमांना आवर्जून चालना दिली. लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू झाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.