महिलांना कौशल्य आधारित संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

16

पुणे : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि समर्थ युवा फाऊंडेशन स्कूल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे छत्रपती शिवाजीनगर येथील मॉर्डन महाविद्यालय येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, कुटुंबांच्या आर्थिक गरजांसाठी युवकांसोबतच महिलांसाठी कौशल्य आधारित संधी निर्माण करणे गरजेचे आहे. घरातली सर्व जबाबदारी सांभाळत त्यांच्यासाठी कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी घरीच कशा उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे. कौशल्यांमुळे चांगले उत्पन्न मिळून आर्थिक प्रगती होते. संपूर्ण जगात कौशल्याधारीत मनुष्यबळाला मोठी संधी निर्माण झाली असून युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा. पारंपरिक शिक्षण घेतलेल्यांनी कौशल्यांची जोड दिल्यास या संधी मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी समर्थ युवा फाऊंडेशनने पुढाकार घेतल्याबद्दल प्रशंसा करुन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, युवा पीढी सक्षम, आत्मनिर्भर, उद्योजक, साक्षर आणि कौशल्यप्राप्त व्हावी यासाठी केंद्र शासनाने अर्थसंकल्पात सुमारे १ लाख ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देशातील एक कोटी तरुणांना कार्य प्रशिक्षणासाठी देशातील मोठ्या कंपन्यांना अनुदान देण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हीडीओ संदेश दाखविण्यात आला.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, कौशल्य विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अनुपमा पवार, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक सहसंचालक रमाकांत भावसार, समर्थ युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.