विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : सोमेश्वर फाउंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्यावतीनं ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंचा भव्य नागरी सत्कार समारंभाचा सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक पटकवणाऱ्या स्वप्नील कुसळे यांच्यासह महिला तिरंदाज आदिती स्वामी, मल्लखांब पट्टू शुभंकर खवले, तिरंदाज प्रवीण जाधव , तिरंदाज ओजस देवतळे, सर्वेश कुशारे या विविध खेळामध्ये नैपुण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे देशाचा लौकिक वाढविणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसळेसह महाराष्ट्रातील अन्य खेळाडूंचा चंद्रकांत दादा पाटील, उद्योजक पुनीत बालन,अर्जून पुरस्कार विजेत्या दिपाली देशपांडे यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, राज्याच्या क्रीडा धोरणानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका, जिल्हा व विभागाच्या ठिकाणी महाराष्ट्र स्पोर्ट्स, महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहे. तसेच शारीरिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठीही शासन प्रयत्नशील असून; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्या स्पर्धकांना क्लास वन पदावर थेट नियुक्ती करण्याचा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सरकारने घेतला आहे. अनेक खेळाडूंना या निर्णयाचा लाभ झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी देखील क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, अशी भावना यावेळी पाटील ययांनी व्यक्त केली.
यावेळी नामांकित क्रीडा पत्रकार यांनाही सन्मानित करण्यात आले. या समारंभास मोठ्या संख्यने क्रीडापटू तसेच पुणेकर नागरिक उपस्थित होते