आपल्या देशाकडे संपूर्ण जग वेगळ्या अपेक्षेने पाहत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली ओळख जपावी, आणि मिळणाऱ्या संधीचं सोनं करावं – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने सलग २२ वर्षे गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचे आयोजन करण्यात येते. यंदाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ‘12th Fail’ चित्रपटाचे वास्तवातील नायक, जिद्द आणि चिकाटीने अपयशावर मात करून आयपीएस झालेल्या मा.श्री. मनोज कुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आज आपल्या देशाकडे संपूर्ण जग वेगळ्या अपेक्षेने पाहत आहे. ‘जग ज्येष्ठांचे होत चालले आहे, भारत तरूणांचा होत चाललाय. त्यामुळे जगाला त्यांचे-त्यांचे देश चालवण्यासाठी भारतीय विद्यार्थी-विद्यार्थिनींची आवश्यकता भासत आहे. जर्मनी सारख्या देशाला चार लाख कुशल, प्रामाणिक व मेहनती मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी तो आपल्याकडे आशेने पाहत आहे. पाठोपाठ जपान देखील आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली ओळख जपावी, आणि मिळणाऱ्या संधीचं सोनं करावं, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या मुलांनी ९५ टक्क्यांहून अधिकच गुण मिळवले पाहिजेत अशी पालकांची अपेक्षा असते. त्याच्याच बरोबरीने त्यांनी कलात्मक असणे, खेळात प्रावीण्य मिळवणे आणि अखेरीस व्यक्तिमत्त्व घडवणे याही अपेक्षा विद्यार्थ्यांकडून ठेवल्या जातात. परंतु, व्यक्तिमत्त्व प्रभावी बनण्यासाठी विद्यार्थ्यांचा सामाजिक संवाद वाढणे गरजेचे, असे मत आयपीएस श्री. मनोज कुमार शर्मा जी यांनी व्यक्त केले.
भारताच्या ३५ वर्षांखालील लोकसंख्येचा वाटा सुमारे ६६ टक्क्यांचा आहे. आपला देश जगातील सर्वाधिक तरूण देश आहे. त्यामुळे विकसित भारत घडविण्याची जबाबदारी या तरूण पिढीवर अधिक आहे. तसेच, देशातील एक लाख तरूणांनी राजकारणात येण्याची पंतप्रधान मोदीजींची इच्छा असून विद्यार्थ्यांनी राजकारणाकडेही करिअर म्हणून पाहावे’, अशी भूमिका मुरलीधर मोहोळ यावेळी प्रास्ताविकात मांडली.
यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, माजी नगरसेविका मोनिका वहिनी मोहोळ, हर्षाली माथवड, वासंती जाधव यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.