राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न… राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती
पुणे : पुणे येथील सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) च्या २१ व्या दीक्षांत समारंभास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. देशातील विविध समुदाय, प्रदेशांची संस्कृती आणि त्यांच्या आजच्या गरजा समजून घेत देशातील प्रत्येकाच्या विशेषतः दुर्लक्षित घटकाच्या विकासाला सहाय्यकारी होऊ शकतील अशी सॉफ्टवेअर, आरोग्यसेवा उत्पादने आणि बाजारपेठीय धोरणे बनवावीत, असा संदेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार, कुलगुरु डॉ. रामकृष्णन रमण, प्र. कुलगुरु विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.
पदवीप्रदान सोहळ्यात पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या, आज मुले आणि मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. नारी शक्तीचा विकास हा देशवासियांसाठी अभिमानाचा विषय आहे, शिवाय देशाच्या विकासाचाही तो एक महत्त्वाचा मापदंड आहे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात लिंग समानतेला प्राधान्य दिले जाते ही बाब प्रशंसनीय आहे. पदवीप्रदान सोहळ्यात सुवर्णपदक प्राप्त ११ विद्यार्थ्यांपैकी ८ मुली असल्यावरून मुलींच्या शिक्षणासाठीही येथे योग्य वातावरण आणि सुविधा दिल्या जातात, असे दिसून येते. मुलींना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासह त्यांच्यासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यक्रम राबवण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी शैक्षणिक संस्थांना केले.
यावेळी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट परदेशी विद्यार्थ्याचा पुरस्कार नायजेरीया देशाचा डिलाईट पीटर्स या विद्यार्थ्याला देण्यात आला. तसेच १२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. तसेच विद्यापीठात शिकणाऱ्या ३५ देशाच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या देशाचे राष्ट्रीयध्वज राष्ट्रपती यांच्याकडे प्रदान करून एकत्रित केले.