‘धर्मवीर’च्या पहिल्या भागानंतर प्रेक्षकांची दुसऱ्या भागाची उत्सुकता पाहून दिघे साहेबांचा चाहता वर्ग आजही महाराष्ट्रभर पसरलेला आहे याचा अभिमान वाटतो – चंद्रकांत पाटील
पुणे : ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, शिवसेनेचे नेते गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांचा जीवनप्रवास उलगडणारा ”धर्मवीर – २ मुक्काम पोस्ट ठाणे – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” हा बहुप्रतीक्षित चित्रपट नुकताच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या चित्रपटाचा प्रीमिअर शोला हजेरी लावली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर देणारे गुरुवर्य आनंद दिघे साहेबांनी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी केलेले कार्य सर्वांसाठी आदर्श आहे. हा चित्रपट म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वैचारिक हिंदुत्वाचा वारसा पुढे नेणारा आहे. ‘धर्मवीर’च्या पहिल्या भागानंतर प्रेक्षकांची दुसऱ्या भागाची उत्सुकता पाहून दिघे साहेबांचा चाहता वर्ग आजही महाराष्ट्रभर पसरलेला आहे याचा अभिमान वाटतो. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या ‘धर्मवीर – २’ च्या स्क्रिनिंगला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. शिवसेनेचे दिवंगत नेते व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दातेने साकारली आहे.