कोथरूडला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी श्वास मिळवून देणाऱ्या प्र. स. दंडवते यांचा नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार
पुणे : कोथरूडच्या विकासासाठी आयुष्यभर कार्यरत राहून, परिसरातील कचऱ्याच्या प्रश्नाला वाचा फोडत कोथरूडला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी श्वास मिळवून देणाऱ्या प्र. स. दंडवते (वय ८९ वर्षे) यांचा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कोथरुडकरांसाठी तयार केलेला आणि मेनका प्रकाशन प्रकाशित ‘कोथरुड–२०२५’ या दुसऱ्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी हा सत्कार सोहळा संपन्न झाला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, कोथरूड हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशात सर्वाधिक पसंतीचे उपनगर. या उपनगराच्या विकासासाठी हयात घालवणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तित्वाचा सन्मान करण्याइतकी ज्येष्ठता मला अद्याप प्राप्त झालेली नाही. या सत्कार प्रसंगी पाटील यांनी स्वतःच्या हातातील घड्याळ काढून दंडवते काकांच्या हातावर बांधले. हा केवळ सत्कार नव्हे, तर एका सच्या कोथरूडकराच्या कार्यकर्तृत्वाला दिलेला मनापासूनचा सन्मान होता, असे मी मानतो, असे पाटील म्हणाले. कोथरूडच्या समाजजीवनात योगदान देणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वांचा आदर हा आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतो, असेही यावेळी पाटील म्हणाले.
कार्यक्रमाला भाजपा नेत्या मोनिका (वहिनी) मोहोळ, ज्येष्ठ पत्रकार व मेनका प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक अभय कुलकर्णी, नामवंत ब्रॅण्ड सल्लागार व लेखक अभिजीत जोग, प्रा. डॉ. रुपाली शिंदे, मेनका प्रकाशनचे कार्यकारी संचालक अमित टेकाळे, संचालक किरण वेल्हाणकर, तसेच अंकाचे कार्यकारी संपादक सुकृत करंदीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.