योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘योगीराज भूषण’ पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
पुणे : योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘योगीराज भूषण’ पुरस्कार यंदा उद्योजक विजयराव बोत्रे, रामदास मुरकुटे, स्वप्नील कुसळे, स्नेहल शिंदे-साखरे, सुनिता बोर्डे-खडसे, रमिला लटपटे यांना प्राप्त झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विजेत्यांचा गौरव केला.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले, योगीराज नागरी पतसंस्थेची वार्षिक उलाढाल ही एखाद्या बॅंकेसारखी आहे. पतसंस्थेने आगामी काळात महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
यावर्षीचा योगीराज भूषण पुरस्कार उद्योग क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलेले यशस्वी उद्योजक विजयराव बोत्रे यांना तर योगीराज जीवन गौरव पुरस्कार हॉटेल क्षेत्रामध्ये विशेष योगदान दिलेले बाणेर गावचे रामदास मुरकुटे (संस्थापक स्वरा ग्रुप ऑफ हॉटेल्स) यांना प्रदान करण्यात आला. तसेच योगीराज विशेष गौरव पुरस्काराने भारतीय नेमबाज ऑलम्पिक कास्य पदक मिळविल्याबद्दल स्वप्निल कुसाळे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल स्नेहल शिंदे (साखरे), फिन्द्री कादंबरीच्या सुप्रसिद्ध लेखिका प्राध्यापिका डॉ. सुनिता बोर्डे आणि नऊवारी साडी घालून चाळीस देशांचा बुलेटवर प्रवास केल्याबद्दल भारत की बेटी रमिला उर्फ रमाबाई लटपटे यांना देण्यात आला.
याप्रसंगी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आ.भीमराव तापकीर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, बाळासाहेब काशिद, गणेश कळमकर, लहू बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर यांसह संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.