कोथरूड मधील कार्यकर्त्यांना साष्टांग दंडवत, तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा शतशः आभारी – चंद्रकांतदादा पाटील
पुणे : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सातत्याने सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागले. प्रसंगी कुटुंबियांचाही रोष पत्करून काम केले, त्यामुळे तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा शतशः आभारी आहे, अशी भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी साष्टांग दंडवत घालत सर्व कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कोथरूडमधील मायबाप जनतेने 1 लाख 12 हजार 41 अशा विक्रमी मताधिक्याने आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार!, असेही पाटील यांनी म्हटले.
कोथरुड विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मंडल कार्यालयात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचेही आभार मानले.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड मधील विजयासाठी गेले महिनाभर रात्रंदिवस सर्व कार्यकर्ते एक दिलाने झटत होते. प्रसंगी कुटुंबियांचा रोष पत्करून देखील काम करत होते. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच हा ऐतिहासिक विजय साकार झाला. त्यामुळे तुम्हा सर्वांचा ही मी शतशः आभारी आहे. तसेच, गेले महिनाभर तुम्हाला साथ देणाऱ्या कुटुंबियांचे ही मनापासून आभार मानतो.
पाटील पुढे म्हणाले कि, माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवणाऱ्या कोथरूडकरांचा मी आजन्म ऋणी आहे. सर्वांनी दिलेलं प्रेम, विश्वास यामुळे मला आणखी बळ मिळालं आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमातून या जन्मात तरी मी उतराई होऊ शकणार नाही. माझे आणि कोथरूडकरांचे जन्मो-जन्मीचे नाते आहे, हेच आजच्या यशातून अधोरेखित होते. मला मिळालेले कोथरूडकरांचे प्रेम ही माझी पुण्याई आणि हीच माझी खरी श्रीमंतीही आहे. मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शाह जी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानतो, असे पाटील यांनी म्हटले.