उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांचे कोथरूडमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत
पुणे : राज्य मंत्रिमंडळात उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचे कोथरूडमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पाटील यांनी पद्धत स्वीकारल्यानंतर प्रथमच मतदारसंघातील महापुरुषांना अभिवादन केले तसेच धार्मिक स्थळांना भेट देऊन दैवतांचा आशीर्वाद घेतला. यासोबतच सदैव पाठीशी राहणाऱ्या कोथरूडच्या जनता जनार्दनाचे मनापासून आभार देखील मानले.
चंद्रकांत पाटील यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर त्यांचे पुण्यात भाजपा कोथरूड मतदार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या निमित्ताने कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे , स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये कोथरूडकरांनी भरभरून आशीर्वाद दिले. त्याबद्दल मायबाप कोथरूडकर यांच्याप्रती चंद्रकांत पाटील यांनी कृतज्ञताही यावेळी व्यक्त केली.
यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडचे ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिर तसेच श्री दशभुजा गणपती मंदिरात जाऊन बाप्पांची मनोभावे आरती करत दर्शन घेतले. यावेळी नागरिकांच्या उज्ज्वल आणि निरोगी आयुष्यासाठी श्रींच्या चरणी प्रार्थना केली.