आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक…त्यांचे विलक्षण संघटन कौशल्य आणि दीर्घ अनुभव पक्षाला यशाची नवनवी शिखरे गाठून देईल, असा विश्वास – चंद्रकांत पाटील

मुंबई : डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ही निवड केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला व त्यांच्याकडे महसूल हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. आमदार रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्याचवेळी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांच्याकडे त्यापूर्वी संघटनपर्व पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना कार्यकारी अध्यक्षपद दिले गेले आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षाचे नेते, माजी मंत्री, आ. रवींद्र चव्हाण जी यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी रवींद्र चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांचे विलक्षण संघटन कौशल्य आणि दीर्घ अनुभव पक्षाला यशाची नवनवी शिखरे गाठून देईल, असा विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले. रवींद्र चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या नेतृत्वात पक्षाला उदंड यश मिळो, ही सदिच्छा देखील पाटील यांनी व्यक्त केली.