आता महाराष्ट्र थांबणार नाही…महाविजयी प्रदेश अधिवेशनात साईबाबांच्या पावन नगरीत भाजपचा निर्धार; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा अधिवेशनात सहभाग

शिर्डी : श्री साईबाबांची पावन नगरी शिर्डी येथे “भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशन २०२५”आयोजित करण्यात आले होते. हे अधिवेशन केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विधानसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर हे पक्षाचे पहिलेच राज्यव्यापी अधिवेशन होते. भाजपाच्या प्रमुख नेत्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील देखील या अधिवेशनास उपस्थित होते.
या अधिवेशनात मत व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन लाभणे हीच एका कार्यकर्त्याची इच्छा असते. माननीय अमितजींच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना काम करण्यास नवी उमेद मिळाली. तसेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष भविष्यात अधिक गतीने वाटचाल करेल असा विश्वास असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले.
कुणीही विश्वासघात करू शकणार नाही, असा अजिंक्य भारतीय जनता पक्ष आपल्याला तयार करायचा आहे आणि स्थानिक पातळीवरील निवणुकांमध्ये आणखी मोठा विजय प्राप्त करायचा आहे, असे म्हणत अमित शाह यांनी शिर्डी येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले.
यावेळी, पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खा. अशोक चव्हाण यांच्यासह पक्षाचे लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.