पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे पोलिसांच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत किमती मुद्देमाल वितरण समारंभ संपन्न

पुणे : सुमारे ३०० नागरिकांचा चोरीला गेलेला जवळपास ३ कोटी ८० लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल पुणे पश्चिम प्रादेशिक मंडळाच्या कामगिरीमुळे जप्त करण्यात पोलीस दलाला यश मिळाले आहे. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या सर्व नागरिकांचा मुद्देमाल परत करुन, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.
पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे पोलिसांच्या वतीने आज किमती मुद्देमाल वितरण समारंभ पार पडला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या देशभरातील विविध घटना पाहता केंद्र सरकारने देखील अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आपणही आपल्या आसपास कोण वावरतोय हे पाहून, एखाद्याचे वावरणे संशयास्पद असेल, तर त्याची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी, असे आवाहन या प्रसंगी केले.
यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशजी कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्यासह पोलीस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशजी कुमार यावेळी म्हणाले, आम्ही नागरिकांचा मुद्देमाल परत करून उपकार करत नाही, ते आमचे कामचं आहे. जो मुद्देमाल आम्हाला मिळाला आहे तो मुद्देमाल पुढील काळात १ महिन्याच्या आत कायद्याच्या कार्यवाही करून नागरिकांना परत देण्याचा मानस आम्ही ठेवला आहे.