महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ हटाव कृती समितीच्या मागण्यांसंदर्भात गठीत समितीची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

मुंबई : महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी मागणी कला क्षेत्रातील नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासंदर्भात शासन स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ हटाव कृती समितीने शासनास सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींच्या अनुषंगाने गठीत समितीने सखोल अभ्यास करून तातडीने सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, अशा स्पष्ट सूचना पाटील यांनी बैठकीत दिल्या.
राज्यातील कला महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात वर्गवारी करून सविस्तर प्रस्ताव तयार करावा, प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर वित्त विभागाकडे सादर करून यावर शासन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.असेही चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.
सध्या शासकीय किंवा विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना “पदवीधर” असा दर्जा दिला जातो, तर इतर कला महाविद्यालयांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना “पदविका धारक” मानले जाते. या असमानतेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक नुकसान होते. त्यामुळे कला महाविद्यालयांचे विद्यापीठात रूपांतर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ हटाव कृती समितीने केली आहे.
बैठकीत राज्यात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यामुळे कला शिक्षण अधिक दर्जेदार आणि व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त ठरू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी,सर जे.जे. कला, वास्तू कला व अभिकल्प विद्यालय, मुंबई (डि नोव्हो अभिमत विद्यापीठ) कुलगुरू तसेच समितीचे अध्यक्ष डॉ. रजनीश कामंत, सर जे.जे. उपयोगिता कला महाविद्यालयाचे अधिव्याख्याता तथा प्रभारी संचालक संतोष क्षीरसागर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.