चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कोथरूडमधील वाहतूक कोंडी आता मार्गी लागणार… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे दिले आश्वासन

84

पुणे : कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना आज निवेदन दिले. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली असून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कालबद्ध नियोजन करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, वाहतूक कोंडीबरोबरच पुणे बायपास मार्गावरुन लोकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. ही गंभीर समस्या वेळेत सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ३३ प्रमुख रस्त्यांपैकी १५ प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी ‘मिशन १५’ हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, कोथरुड मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ३२५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यापैकी १५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून अपेक्षित आहे, असे एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले.

याबाबत शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली असून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कालबद्ध नियोजन करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. विकासकामाला अधिक गती देण्यासाठी रोड टीडीआर (ट्रान्स्फर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स) निर्माण करणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच जे विकासक रोड टीडीआर घेण्यास इच्छुक असतील, त्यांना दोन टक्के अतिरिक्त प्रोत्साहन देण्यात येईल असे सांगून यासाठी सर्वतोपरी सहकार्याबद्दल शिंदे यांनी आश्वस्त केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.