विट्यातील पत्रकार हल्ला प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने राज्यभरात या घटनेचा निषेध नोंदवला आहे. या हल्लेखोरावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यसह प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली होती. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विटा येथील पत्रकारावरील झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेची गंभीर दाखल घेतली आहे.
विट्यातील पत्रकार हल्ला प्रकरणी दोषींची गय केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना या घटनेच्या बाबत स्पष्ट सूचना देखील पाटील यांनी दिल्या.
जागेचा वाद आणि युट्युब वर बातमी दाखविल्याचा राग मनात धरून पत्रकार प्रसाद प्रकाश पिसाळ यांच्यावर कोयत्यासारख्या धारदार शास्त्राने आणि स्टीलच्या रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पिसाळ गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी महिला कर्मचारी जोशी सोडविण्यासाठी आल्या असत्या त्यांनाही मारहाण करण्यात आली. पिसाळ यांच्यावर साध्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.