उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली कार्यालयाचा कारभार अधिक प्रभावी व गतिमान करणार, डॉ. राजेश देशमुख यांनी सचिवपदाचा कार्यभार स्वीकारताना व्यक्त केला विश्वास

69

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला. डॉ. राजेश देशमुख हे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदासह उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वं, कुशल मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार अधिक गतिमान प्रभावी करण्यावर आपला भर असेल, असे डॉ. राजेश देशमुख यांनी कार्यभार स्विकारतानांच स्पष्ट केले आहे.

डॉ. राजेश देशमुख यांनी कार्यभार स्विकारताच उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच कोणतेही प्रकरण किंवा नस्ती प्रलंबित राहू नये, अशा सूचना सहकारी अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्री कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या आणि लोकहिताच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्यात येईल. धाडसी निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करणारं दूरदृष्टीचं नेतृत्वं ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेस साजेसं काम करण्याचा आपला प्रयत्न राहीला पाहिजे, असेही त्यांनी बैठकीत सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे नुकतीच उत्पादन शुल्क आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यासह आता उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदाची जबाबदारीही ते सांभाळणार आहेत. त्याआधी कोकण विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, साखर आयुक्त, हाफकीन इन्टिट्यूटचे संचालक म्हणून यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी सचिवपदाची सूत्रे स्विकारल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय प्रशासन अधिक गतिमान, सकारात्मक पद्धतीने काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. राजेश देशमुख यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर कार्यालयाचे प्रशासकीय सल्लागार सतीश मोघे, उपसचिव विनायक चव्हाण, डॉ. नवनाथ जरे, उपसचिव विकास ढाकणे, खाजगी सचिव डॉ. अमर भडांगे, अविनाश सोलवट, विशेष कार्य अधिकारी नरेश भैरी, विलास धाईजे, अवर सचिव सचिन बाभळगावकर, कक्ष अधिकारी विजय लिटे आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.