ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विधानसभेत निवेदन

मुंबई : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण, स्त्री शिक्षाम पददलितांचे शिक्षण, महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य, स्त्रीभृणहत्या प्रतिबंधात्मक कार्य, वंचित क्षेत्रातील महिलांसाठी कार्य इत्यादी क्षेत्रात निरलसपणे कार्य करणाऱ्या राज्यातील ६ महसूल विभागातील प्रत्येकी एक या प्रमाणे ६ मान्यवर महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२२-२३ या वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी शासनस्तरावरील निवड समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून जाहीर केले.
2022-23 या वर्षाच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी पुणे विभागातून जनाबाई उगले, नाशिक – डॉ प्राजक्ता कुलकर्णी, कोकण – फूलन शिंदे, छत्रपती संभाजीनगर – मीनाक्षी बिराजदार, अमरावती – वनिता अंभोरे, नागपूर – शालिनी सक्सेना यांची निवड झाली असून 10 तारखेला संध्याकाळी एसएनडीटीच्या सभागृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी सभागृहात दिली. पुरस्कारप्राप्त महिलांना रुपये १ लाख आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य हे ऐतिहासिक असुन, अनेकांना प्रेरणा देणारे आहे.यातुनच राज्यातील अनेक महिला प्रेरणा घेवुन मुलींचे शिक्षण, समाजसेवा, महिलासक्षमीकरण यात निरपेक्षपणे कार्य करीत असतात.त्यांचेसाठी राज्य शासनाने १९८१ साली सावित्रीबाई फुले पुरस्कार सुरू केला होता.पण काही कारणामुळे तो २०१३ पासुन बंद झालेला होता.परंतु मागील वर्षी राज्य शासनाने १६ जानेवारी व २ फेबुवारी २०२४ ला शासन निर्णय काढुन सामाजिक कार्य करणार्या महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या नावाने, प्रति एक लाख पुरस्कार व प्रशस्तीपत्र देण्याचे जाहीर केले.