अमली पदार्थ विरोधी लढ्यात सर्वस्व पणाला लावून काम करण्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सांगलीमध्ये ड्रग्स मुक्त अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे, आणि आता त्यांनी कोथरूड मध्ये देखील ‘ड्रग्ज मुक्त अभियान’ राबविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पाटील यांनी कोथरूडमध्ये ‘ड्रग्ज मुक्त अभियान’ राबवत अनेक नागरिकांसोबत अमली पदार्थमुक्त कोथरूडची प्रतिज्ञा केली. यावेळी कोथरुडमधील असंख्य नागरिक उपस्थित होते.
याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थांचा वाढता वापर सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. अनेक तरुण याच्या आहारी जात असल्याचे पाहून मनाला अतिशय वेदना होतात. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी लढा अधिकाधिक तीव्र करण्यासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध झाले पाहिजे. कोथरुड हे माझं घर असल्याने माझं घर स्वच्छ ठेवण्यासाठी मी आग्रही असल्याचे पाटील म्हणाले. यासाठी कोथरुड मधील सूज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन अमली पदार्थमुक्त कोथरुडचा संकल्प केला. यामध्ये पाटील यांनी सहभागी होऊन अमली पदार्थमुक्त कोथरूडची प्रतिज्ञा केली. तसेच, अमली पदार्थ विरोधी लढ्यात सर्वस्व पणाला लावून काम करण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
या अभियानात कोथरुडमधील असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला. विशेषतः महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. कोथरूड मधील हुतात्मा राजगुरू स्मारक, करिश्मा चौक येथे हे अभियान संपन्न झाले. याप्रसंगी भाजपा पुणे सरचिटणीस पुनीत जोशी, मा नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष संदीप बुटेला तसेच कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.