महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांचे निधन… ‘सायकलिंग या क्षेत्रातील एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला आज आपण मुकलो’ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

16

मुंबई : सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांचे आज आकस्मित निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. प्रतापराव जाधव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. सायकलिंग या क्षेत्रातील एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला आज आपण मुकलो असल्याचे पाटील म्हणाले.

प्रतापराव जाधव यांच्या निधनाचे वृत्त समजताच चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पाटील म्हणाले कि, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जाधव यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि अजिंक्यपदही मिळवले. विविध सायकल स्पर्धांचे आयोजन करुन सायकलपटूंना विविध व्यासपीठे मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने सायकलिंग विश्वाची मोठी हानी झाली आहे. सायकलिंग क्षेत्रात त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो, अशी प्रार्थना पाटील यांनी केली.

प्रतापराव जाधव यांनी आपले संपूर्ण आयुष्य सायकलिंग खेळासाठी समर्पित केले. महाराष्ट्र सायकलिंग असोशिएशनमध्ये त्यांनी विविध पदे भूषविली. भारतामधील सायकलिंग क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराने प्रताप जाधव यांना नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. जाधव यांनी दोन वेळा राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेते पद पटकावले.

Get real time updates directly on you device, subscribe now.