ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टितील एका गौरवशाली युगाचा अंत झाला – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन .मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या महान अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले , मनोजकुमार ऊर्फ भारत कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टितील एका गौरवशाली युगाचा अंत झाला आहे. संस्कारक्षम आणि देशभक्तिपर चित्रपटांचे ते अनाभिषिक्त सम्राट होते. सक्षम कथेला समर्थ अभिनय आणि सुमधुर गीतांची जोड देऊन त्यांनी रुपेरी पडदा गाजवला. मनोजकुमार यांनी साकारलेला सोज्वळ आणि सुसंस्कृत नायक त्या जमान्यातील तरुणांचा आदर्श होता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात स्वतःचे आगळे पान लिहिणाऱ्या या महान अभिनेत्याला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, अशी प्रार्थना पाटील यांनी केली.
मनोज कुमार यांंचं खरं नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी.ते पाकिस्तानातील आबोहर येथे जन्मले होते, पण त्यांनी भारतातील जनमानसात देशभक्त कलाकार म्हणून एक खास ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांनी त्यांना ‘भारत कुमार’ ही उपाधी दिली. मनोज कुमार यांनी देशभक्ती ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या चित्रपटांमधून देशप्रेम, सामाजिक भान आणि जबाबदारी यांचा संदेश मिळाला. मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मधे दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मनोज कुमार यांचे वह कौन थी, पूरब औऱ पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांति हे सिनेमे अत्यंत सुपरहिट ठरले.