तमाशा कलावंतांसमोरील आव्हानांच्या अभ्यासासाठी लवकरच समिती – मंत्री ॲड. आशिष शेलार

13

मुंबई : कोरोनानंतर सर्वच क्षेत्रांसमोर विविध आव्हाने उभी राहिली आहेत, तशीच आव्हाने लोककलावंत आणि तमाशा कलावंतासमोरही आहेत. या लोककला व तमाशावर उपजीविका करणारे सर्व घटक यांचा विचार करुन भविष्यात सरकारने करावयाच्या उपाययोजना याबाबत अभ्यास करून अहवाल देण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतला आहे. एक महिन्यात या समितीने अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले आहेत.

तमाशा कलावंत व कला केंद्राच्या शिष्टमंडळांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात मंत्री ॲड. शेलार यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न मांडले होते. आज लोकनाट्य कलाकार व कला केंद्र संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत एक तासाहून अधिक काळ चर्चा करुन त्यांचे म्हणणे मंत्री ॲड. शेलार यांनी ऐकून घेतले.

कोरोनानंतर तमाशा कलावंताना रोजगाराच्या अनेक संधी गमवाव्या लागत आहेत. तसेच काही कलावंत हे या क्षेत्रातून अन्य क्षेत्राकडे वळले. त्यामुळे ढोलकी वादकांपासून विविध कला कौशल्य असलेले कलाकार आज मिळत नाही, अशी अडचण निर्माण झाल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. तसेच कला केंद्र चालवताना असंख्य अडचणी येत असून भविष्यात कला केंद्र व ही कला टिकवून ठेवणे मोठे आव्हान आहे. तमाशा सादरीकरणातही अनेक अत्याधुनिक साधनांचा वापर होऊ लागला असून पारंपरिक तमाशा आणि आजचा तमाशा यामध्ये काही बदल होऊ लागले आहेत. यामुळे एकीकडे तमाशा कलावंत, कला केंद्रचालक यांच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत तर दुसरीकडे ही कला पारंपरिक दृष्टीने टिकून ठेवणे देखील महत्त्वाचे असल्याने याबाबतही या सगळ्या कलावंत व त्यांच्या संघटनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

या संघटनेचे म्हणणे ऐकल्यानंतर मंत्री ॲड.शेलार यांनी याबाबत स्वतंत्रपणे तज्ज्ञांनी अभ्यास करणे आवश्यक असल्याचे नमूद केले व ती बाब सर्वांनी मान्य केली. तमाशा ही कला पारंपरिक पद्धतीने टिकवली जाईल, कलावंताना आर्थिक अडचणी येणार नाहीत व कला केंद्रेही सुरु राहतील, यादृष्टीने सरकारने करायच्या उपाययोजना यासाठी ही समिती अभ्यास करणार आहे. या समितीमध्ये तमाशाशी निगडित सर्व घटकांचे प्रतिनिधी तसेच अभ्यासक अशा सात ते आठ सदस्यांची ही समिती असावी. या समितीने तमाशा कलावंतांचे व कला केंद्रांचे प्रश्न, त्यासाठी सरकारने करायच्या उपाययोजना, या सोबतच कलेचे पारंपरिक रुप टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहन देणे, जगभरात या कलावंताना संधी कशी मिळेल यासाठी काही उपाययोजना सुचवणे, आदी सर्व बाबींचा सर्वंकष विचार करेल व या समितीने एक महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले. या बैठकीला सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक विभागाचे संचालक विभिषण चवरे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.