शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२२-२३ व २०२३-२४ वितरण समारंभ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२२-२३ व २०२३-२४ वितरण समारंभ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास चंद्रकांत पाटील यांनी सर्व सन्मानित खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
सन २०२२-२३ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे यांना तर सन २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना वितरित करण्यात आला. उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्राने देशाचे अनेक क्षेत्रात नेतृत्व केले आहे, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांना खूप लहान वयापासूनच खेळांमध्ये सहभागी करून घ्यावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
छत्रपती शिवरायांनी जशी महाराष्ट्राला दिशा दाखवली तशीच महाराष्ट्रातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम सर्व पुरस्कार विजेत्यांनी करावे; आणि सर्व प्रकारच्या खेळांमध्ये महाराष्ट्रच प्रथम क्रमांकावर राहील अशा प्रकारचा संकल्प घेऊ या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.शिवछत्रपतींचे नाव या पुरस्काराच्या माध्यमातून खेळाडूंच्या नावासोबत लागत आहे, ही आपण केलेल्या मेहनतीला एक प्रकारची राजमान्यता आहे. पुरस्कारप्राप्त सर्वांनीच खेळाच्या आणि खेळाडूंच्या विकासासाठी आपले पूर्ण योगदान द्यावे, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
पुरस्कारार्थींनी त्यांच्या खेळावरील प्रेम, मेहनत आणि क्रीडा कौशल्याने क्रीडा क्षेत्राचा आणि देशाचा गौरव वाढविला आहे. महाराष्ट्र खेळाच्या बाबतीत मागे राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी राज्य शासन पाठीशी राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमास क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, पणनमंत्री जयकुमार रावल, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, प्रशांत बंब, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा व युवक सेवा आयुक्त हिरालाल सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.