पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर ‘कलापथा’चा चैतन्यमयी आविष्कार; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कलाकारांचा वाढवला उत्साह

16

पुणे : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने फर्ग्युसन रोडवर आयोजित ‘कलापथ’ या प्रदर्शनाने पुणेकरांची मने जिंकली. या प्रदर्शनाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन कलाकारांचा उत्साह वाढवला. विशेष म्हणजे, या प्रदर्शनातील भारावलेल्या वातावरणात मंत्री पाटील यांनी स्वतः हातात ब्रश धरून कॅनव्हासवर चित्र रेखाटत आपला कलाविष्कार सादर केला.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, मराठी भाषेची समृद्धी आणि आपली कला संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने उभारलेले हे व्यासपीठ खरोखरच कौतुकास्पद आहे. या ‘कलापथा’वर फेरफटका मारताना महाराष्ट्राच्या संपन्न कलावैभवाचे दर्शन घडले. या प्रदर्शनात ७० हून अधिक कलाकारांची ‘लाईव्ह आर्ट’ (थेट कलाविष्कार), सुबक सुलेखन (Calligraphy) आणि दुर्मिळ टपाल तिकिटांचा संग्रह पाहण्याची संधी मिळाली.

पाटील पुढे म्हणाले, या प्रदर्शनातील कलामयी वातावरण इतके प्रेरणादायी होते की, चित्रकलेच्या माध्यमातून माझे कौशल्य सादर करण्याचा मोह मलादेखील आवरला नाही. शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त होणाऱ्या या कलाकारांचा उत्साह पाहून मन प्रसन्न झाले, असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. सर्व रसिक पुणेकरांनी या ‘कलापथा’ला नक्की भेट द्यावी, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

याप्रसंगी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर, निवासी संपादक श्रीधर लोणी, सुनील देशपांडे, नगरसेवक सुनील पांडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.