पुण्यात झिपलायनिंग करणं पडलं महागात… ३० फूट उंचीवरून पडून २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू

162

पुणे : पुण्यातील एक नावाजलेल्या रिसॉर्टमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २८ वर्षीय तरुणीचा झिपलायनिंग करताना दुर्दैवी मृत्यू झाला. झिपलायनिंग करत असताना हि तरुणी ३० फूट उंचीवरून खाली कोसळली. या दुर्घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्त्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजगड वॉटरपार्कमध्ये हि धक्कादायक घटना घडली. या मृत पावलेल्या २८ वर्षीय तरुणीचे नाव तरल अटपाळकर असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार तरल हि एका नामांकित कंपनीत जॉब करत होती. ती पुण्यातील नर्हे परिसरात राहत होती.

सुट्टीमध्ये धम्माल करण्यासाठी म्हणून हि तरुणी शुक्रवारी पुण्यानजीकच्या भोर येथील राजगड वॉटरपार्कला आपल्या कुटुंबियांसोबत गेली होती. दिवसभर तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी सर्व राईड्सचा आनंद घेतला. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तरल झिपलायन करण्यासाठी गेली. रोपवर चालत असताना तिने सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंग करण्याचा प्रयन्त केला. पण त्यावेळी रेलिंगपर्यंत हात जात नसल्याने तरलने जवळच्या लोखंडी स्टूलवर उभी राहून दोर लावण्याचा प्रयन्त केला. यावेळी स्टूल हलला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय सटकला. त्यांनतर ती थेट ३० फूट उंचीवरून खाली पडली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु खूप उशीर झाला होता. या घटनेत तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.