समाजातील सर्वात शेवटच्या घटकाला त्यांचा हक्क मिळवून देणे हीच स्व. बाबा देसाई यांना खरी श्रद्धांजली ठरेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :भाजपाचे ज्येष्ठ नेते व गोकुळ दूध संघाचे माजी संचालक विजय उर्फ बाबा देसाई यांचे दुःखद निधन झाले आहे. यानिमित्ताने भाजपा कार्यालय नागाळा पार्क येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून स्व. बाबा देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करतं म्हटले कि, समाजातील सर्वात शेवटच्या घटकाला त्यांचा हक्क मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
यावेळी खासदार धनंजय महाडीक, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार संजय घाटगे, मकरंद देशपांडे, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, व्ही.बी.पाटील, सुनिल मोदी, किशोर घाटगे, आर.के.पोवार, बाबा इंदुलकर यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या कठीण काळात बाबा देसाई यांनी पक्षाची धुरा सांभाळली. समाजातील प्रत्येक घटकाला जोडून संघटना वाढवली. कामगार, फेरीवाले यांच्या संघटना उभारल्या. आपली वैचारिक बैठक पक्की ठेऊन त्यांनी सर्व विचारधारेच्या कार्यकर्त्यांना आपलेसे केले. हे आजच्या शोकसभेत आपल्याला दिसते आहे. पक्षाच्या कठीण काळात त्यांनी भाजपाचे काम केले, वाढवले आणि टिकवले. त्यांना समाजातून प्रचंड त्रास झाला, पण त्यांनी कधीच पक्ष आणि विचार सोडला नाही. समाजातील सर्वात शेवटच्या घटकाला त्यांचा हक्क मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केल्या.
खासदार धनंजय महाडीक यावेळी म्हणाले, भाजपा कामगार मोर्चा सरचिटणीस, भाजपा जिल्हाध्यक्ष व संघटन मंत्री अशा विविध पदावरती बाबांनी काम केले. हे काम करत असताना पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपाचे संघटन वाढवण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. संघटन कौशल्य असणारे एक व्यक्तिमत्व व तरुणांना मार्गदर्शक म्हणून नेहमीच कोणत्याही कामासाठी मदत करणारे व्यक्तिमत्व आपल्यातून गमावले आहे याचे दुःख होत आहे. आदरणीय बाबांच्या निधनामुळे भाजपा कोल्हापूर मध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे याची सदैव जाणीव राहील.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, महिला मोर्चा अध्यक्ष रुपाराणी निकम, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.